संघ होणे सोपे नाही...

19 Jan 2025 18:12:01
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतेच पक्षांतर्गत बैठकीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची प्रशंसा केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. बातमीनुसार ते म्हणाले की, “संघाच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या विचारधारेशी असलेली निष्ठा आणि वचनबद्धता, विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आली. आपणही छत्रपती शाहू महाराज, जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणार्‍या कार्यकर्त्यांचे, एक मजबूत जाळे उभारण्याकडे लक्ष दिले पाहिजे.”
 
Rashtriya-Swayamsevak-Sangh  
 
शरद पवार हे राजकीय आयुष्य सुरू झाल्यापासून, काँग्रेसच्या पठडीतले आहेत. त्यांनी एकेकाळी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता, त्याचे नाव ‘समाजवादी काँग्रेस’ असे होते. शरद पवार यांची सेक्युलर विचारांशी बांधिलकी आहे, अशीच त्यांची प्रतिमा आहे. त्यांनी संघविरोधी असणे माध्यमांमध्ये स्वाभाविक समजले जाते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कथितपणे निष्ठा आणि वचनबद्धतेबाबत संघाची प्रशंसा करण्याने खळबळ उडाली.
 
संघाप्रमाणे विचारधारेशी एकनिष्ठ आणि वचनबद्ध कार्यकर्त्यांची फळी शरद पवार यांना निर्माण करायची असेल, तर त्यांना शुभेच्छा. संघ शताब्दीच्या वर्षात त्यांच्यासारख्या प्रभावी राजकारण्याला, संघाच्या संघटन क्षमतेची जाणीव झाली असेल तर चांगलेच आहे. तथापि, शरद पवार किंवा संघविरोधी प्रभावळीतील कोणीही संघाच्या पद्धतीने समर्पित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करू पाहत असेल, तर संघ होणे किती अवघड आहे? हे ध्यानात घ्यावे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे निष्ठावंत आणि वचनबद्ध कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी आहे, हे खरेच आहे. एकदा संघाचा निर्णय झाला की, त्यानुसार तंतोतंत अंमलबजावणी करणे, त्यासाठी कितीही नुकसान सहन करणे व या समर्पणाच्या बदल्यात काहीही अपेक्षा न करणे, हे संघ स्वयंसेवकांचे वैशिष्ट्य आहे. संघ व्यक्ती निर्माणावर भर देतो. संघस्थानावर आलेल्या प्रत्येकाला, खुल्या दिलाने स्वीकारले जाते आणि व्यक्ती निर्माणासाठी त्यावर संस्कार केले जातात. हे संस्कार मुख्यतः कृतीवर आधारित असतात.
१९२५ साली प्रथम सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केल्यापासून, गेल्या शतकभरात संघाची व्यक्ती निर्माणाची प्रक्रिया सुरू आहे. संघाची शाखा हे त्यातील सर्वात महत्त्वाचे केंद्र आहे. शाखेसोबतच विविध सेवा प्रकल्पांमधून आणि सकारात्मक कार्यातून, स्वयंसेवक घडत जातात. शंभर वर्षांच्या काळाच्या कसोटीवर उतरलेले संघाचे संघटनशास्त्र आहे. संघाच्या संस्कारातून स्वयंसेवक घडतात ते निष्ठावंत आणि शिस्तबद्ध असतात. पण, त्यांची निष्ठा कोणावर असते? संघ स्वयंसेवकांची निष्ठा ही कोणत्याही व्यक्तीवर नसते, तर ती परमपूज्य भगव्या ध्वजावर असते. आपल्यापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे आणि राष्ट्रनिर्माणासाठी आपण स्वतःची आहुती देत आहोत, असा भाव असतो. ‘इदं न मम, राष्ट्राय स्वाहा’ अर्थात माझे काही नाही, राष्ट्र यज्ञात सर्वकाही स्वाहा, ही संघाची शिकवण स्वयंसेवकांच्या मनात खोलवर रुजलेली असते. ‘अच्छा कर और कुएँ में डाल’, असे संघात पदोपदी मनावर बिंबविले जाते. म्हणजे चांगले काम जरूर करा, पण, त्याची चर्चा करू नका, तर ते विसरून जा म्हणजेच विहिरीत टाका.
 
आपण हाती घेतलेले कार्य हे राष्ट्राच्या हितासाठी आहे, ते कोण्या व्यक्तीच्या महती कथनासाठी नाही याची खात्री असेल, तरच संघ स्वयंसेवक मनोभावे त्यामध्ये उतरतो. स्वयंसेवकांची निष्ठा विचारांवर असते. आपले कार्य राष्ट्रासाठी आहे याची खात्री असली की, संघ स्वयंसेवक कोणताही त्याग करण्यास मागेपुढे पाहत नाही. संघाचे प्रचारक आयुष्यभर अविवाहित राहून आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित करतात, हे बहुतेकांना माहिती आहे. ईशान्य भारतात राष्ट्रकार्यासाठी आपले संपूर्ण तारुण्य व्यतित करणारे आणि त्या बदल्यात कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा न करणारे, अनेक प्रचारक आपल्याला आढळतील. पण, अशा संघाला वाहून घेतलेल्या स्वयंसेवकांप्रमाणेच, प्रपंच करणारे स्वयंसेवकही समर्पित भावनेने काम करतात. माझे कुटुंब संघाचे, वडील कट्टर स्वयंसेवक होते. ते भारतीय मजदूर संघाचेही काम करत. १९८९ साली हेडगेवार जन्मशताब्दीच्या कामाला वेळ देता यावा, यासाठी माझ्या वडिलांनी रेल्वेतील नोकरी सोडली. अद्याप निवृत्तीला दोन वर्षे बाकी होती, मुलामुलींचे विवाह व्हायचे होते, आर्थिक परिस्थिती जेमतेम होती आणि घरही झालेले नव्हते, तरीही माझ्या वडिलांनी नोकरी सोडली आणि संघ कार्याला पूर्णवेळ वाहून घेतले. संघामध्ये माझ्या वडिलांसारखी असंख्य उदाहरणे आढळतील, ज्यांनी निष्ठा, समर्पण व त्यागाला सर्वोच्च महत्त्व दिले. संघाकडे असे लाखो कार्यकर्ते आहेत, ज्यांनी विचारांसाठी आयुष्य समर्पित केले आहे. संघ व्हायचे असेल, तर एवढे व्यक्ती निर्माण केले पाहिजे आणि ते सोपे नाही.
 
संघटनेच्या प्रमुखापासून नेतृत्वातील सर्वांनी आपल्या आचरणाने त्याग, निष्ठा आणि वचनबद्धतेचे उदाहरण घालून द्यावे लागते. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, माधव सदाशिव गोळवलकर ऊर्फ श्री गुरूजी, बाळासाहेब देवरस अशा सरसंघचालकांनी, स्वतः समर्पण, चारित्र्य, त्याग आणि हिंदू राष्ट्रासाठी अविरत परिश्रमांनी आदर्श निर्माण केला आहे. सरसंघचालकांची ही परंपरा, विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यापर्यंत अखंडपणे चालू आहे.
केरळ ते ईशान्य भारतापर्यंत दूर दूर छोट्या गावांमध्ये, असंख्य पीडा आणि अपमान सोसत लाखो प्रचारकांनी आपल्या आयुष्याची आहुती देऊन संघ कार्य केले आहे. ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील,’ या भावनेने कोणत्याही प्रसिद्धीच्या, संपत्तीच्या, सत्तेच्या किंवा मानमरातबाच्या अपेक्षेशिवाय, संघ स्वयंसेवक चार चार पिढ्या राष्ट्रीय विचारांसाठी, भगव्या ध्वजासाठी, हिंदू राष्ट्रासाठी राबले आहेत. अजूनही काम करत आहेत. संघाबद्दल समाजात जो आदरभाव निर्माण झाला आहे, तो स्वयंसेवकांच्या वर्तनामुळे आणि कृतीमुळे निर्माण झाला आहे.
 
भ्रातृभाव हे संघाचे वैशिष्ट्य आहे. आपण सर्वजण अपूर्णांक आहोत, एकत्र आल्यावर पूर्णांक होतो, या भावनेने एकमेकांना सांभाळून घेत आणि इतरांमधील दोष पाहण्यापेक्षा गुणांवर लक्ष केंद्रित करून, त्यांचा राष्ट्रकार्यासाठी उपयोग करून घेत काम करण्यावर स्वयंसेवकांचा भर असतो. संघामध्ये अशा गुणसंपदेबद्दल आदर बाळगला जातो. एखाद्या कुटुंबातील कोणी प्रचारक म्हणून निघाला, तर त्याच्याबद्दल संपूर्ण कुटुंबाला अभिमान असतो.
 
संघाचे संपूर्ण चित्रण करणे शक्य नाही. काही वैशिष्ट्ये सांगितली, ज्यामुळे संघाचा प्रभाव निर्माण झाला आहे आणि संघाकडे निष्ठावंत स्वयंसेवकांची फौज तयार झाली आहे. ज्यांना संघाप्रमाणे कार्यकर्त्यांची फळी उभी करायची आहे, त्यांनी वरील कसोट्या पार करण्याची तयारी ठेवायला हवी. केवळ एखाद्या निवडणुकीत दारूण पराभव झाला, म्हणून निवडणुका जिंकण्यासाठी निष्ठावंतांची फळी निर्माण करण्याचा कोणाचा प्रयत्न असेल, तर त्यांना शुभेच्छा!
 
 
तरुणभारत मुंबई आणि तरुणभारत नागपूरमध्ये प्रकाशित झालेला लेख - तभा मुंबई  | तभा नागपूर
 
Powered By Sangraha 9.0